RSS च्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत ठराव मंजूर, म्हणाले – ‘राम मंदिर हा देशाच्या आंतरिक शक्तीचा आविष्कार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारणीचा झालेला प्रारंभ हा देशाच्या आंतरिक शक्तीचा अविष्कार आहे, त्याबद्दल देशातील नागरिकांचे अभिनंदन करण्याचा ठराव RSS च्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत मंजूर झाला. तसेच एकजुटीने केलेल्या कोरोनाच्या मुकाबल्याबद्दलही प्रतिनिधी सभेने नागरिकांचे अभिनंदन केल्याची माहिती RSS चे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगळुरूमध्ये नुकतीच झाली. त्यातील निर्णयांची माहिती दबडघाव यांनी यावेळी दिली. गेल्यावर्षी 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामालाही सुरुवात झाली आहे. त्याची दखल प्रतिनिधी सभेने घेऊन नागरिकांचे अभिनंदन केले. तसेच कोरोनाचा मुकाबला करताना देशातील अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचा-यांनी नागरिकांच्या मदतीने एकजूट दाखविली. तसेच वित्तीय संस्थेतील कर्मचा-यासह संघटित व असंघटित क्षेत्रांशी संबंधित अनेक समूहांच्या सक्रियतेमुळे दैनंदिन जीवन सुरळीत झाले. त्यासाठी शासकीय स्तरावरून झालेले प्रयत्न, श्रमिक ट्रेन, वंदे भारत मिशन आणि सध्या सुरू असलेले लसीकरण अभियान प्रशंसनीय असल्याचेही प्रतिनिधी सभेने मंजूर केलेल्या ठरावात म्हटले आहे. या सभेला संघाचे देशातील सुमारे 450 सदस्य उपस्थित होते.