श्रीराम मंदीर भूमि पूजनासाठी जेजुरीच्या खंडोबाचा भंडारा अयोध्येत

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – अयोध्येत बुधवारी श्रीराम मंदीर बांधकामाचे भूमिपूजन होत आहे,यासाठी साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबाचा बेल भंडार आज पाठविण्यात आला. खंडोबाचे निस्सीम भक्त असलेल्या उमाजीराजे नाईक यांच्या रामोशी समाजातील कार्यकर्त्यांनी गडावरून हा भंडार आणला होता.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन खंडोबा प्रतिमेचे पूजन केले व खंडोबा देवाच्या स्वयंभू लिंगावरील आणलेला बेलभंडार अयोध्येकडे रवाना केला .विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मप्रसारक राजाभाऊ चौधरी,किरण बारभाई, वैभव लांघी, यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी १९९२ साली अयोध्येला गेलेले नगरसेवक मनोहर भापकर, प्रकाश खाडे यांच्या हस्ते खंडोबाच्या व श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन झाल्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रभू रामचंद्रांचा जयजयकार केला. राजाभाऊ चौधरी यांनी पुणे येथे आचार्य भास्करगिरी महाराज यांचेकडे भंडार अयोध्येला नेण्यासाठी सुपूर्द केला यावेळी अविनाश मरकळे, पराशर मोरे,संतोष शिवले आदी उपस्थित होते.

बुधवारी पहाटे खंडोबा गडामध्ये पूजा अभिषेक केला जाणार आहे .गावातील राम मंदिर, कडेपठारचे राममंदिर, हनुमान मंदिर व सर्वच मंदिरामध्ये कार्यकर्ते पूजा करून दिवे लावणार आहेत, जेजुरीत सर्वत्र २०० किलो साखर वाटून आनंद साजरा केला जाणार आहे अशी माहिती संयोजकांनी दिली. राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या वेळी गडावर सनई चौघडा, नगारा वाजविण्यात येणार आहे.