बलात्कार आणि खूनप्रकरणी जन्मठेप भोगत असलेल्या राम रहीमला पॅरोलवर गुपचूप तुरूंगाबाहेर सोडलं

चंदीगड : वृत्तसंस्था – डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार, हत्या अशा गंभीर गुन्हांसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गुरमीत राम रहीम याला एक दिवसाची पॅरोल मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २४ ऑक्टोबर रोजी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली बीजेपी-जेजेपी सरकारने एका दिवसाचा पॅरोल दिला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहीमला आपल्या आजारी असलेल्या आईच्या भेटीसाठी एक दिवसाचा पॅरोल देण्यात आला होता. राम रहीमच्या आईवर गुरुग्राममधील एक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डेरा प्रमुख राम रहीम बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात दोषी आढळल्यापासून रोहतकमधील सुनारिया कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तेथून त्याला गुरुग्राममधील रुग्णालयात चोख बंदोबस्तात नेण्यात आले.

जवळसपास ३०० पोलीस तैनात
डेरा प्रमुखाच्या सुरक्षेसाठी हरियाणा पोलिसांच्या तीन तुकड्या तैनात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या होत्या. त्यातील एका तुकडीत ८० ते १०० जवान होते. राम रहिमला पोलिसांच्या वाहनातून गुरुग्राममधील रुग्णालयात नेण्यात आले होते. भेटीच्या वेळी राम रहीमची आई उपचार घेत असलेला मजला संपूर्ण रिकामा करण्यात आला होता. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळ पर्यंत तो आपल्या आईसोबत थांबला होता.

गुप्तता पाळण्यात आली
यासंदर्भात रोहतकचे एसपी राहुल शर्मा म्हणाले, आम्हाला जेल अधीक्षकांकडून राम रहीम यांच्या गुरुग्राम दौऱ्याकरता सुरक्षा पुरवण्याचे निवेदन मिळाले होते. त्यानुसार २४ ऑक्टोबर रोजी सकाळपासून सायंकाळ पर्यंत सुरक्षा उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र, आपण कुणाला सुरक्षा देत आहोत याची माहिती जवानांना नव्हती. डेरा प्रमुखाला अशा प्रकारे जामीन देऊन हरियाणातील अधिकाऱ्यांनी भविष्यात त्याला पॅरोल देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.