‘हा मला नव्हे तर रोहित पवारांनाच मोठा धक्का’ – राम शिंदे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –   राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी अहमदनगरच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे यांना धक्का दिल्याची चर्चा होती. परंतु राम शिंदे यांनी मात्र मला नव्हे, तर रोहित पवारांनाच हा मोठा धक्का आहे असं म्हटलं आहे. त्यांचा नैतिकदृष्ट्या पराभव झाला आहे असा पलटवार त्यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

जिल्हा बँकेचं संचालकपद पुन्हा एकदा माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक जगन्नाथ राळेभात यांच्या घरात येत आहे. विखेसमर्थक असलेल्या राळेभात यांचा बिनविरोध संचालकपदाचा मार्ग राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामुळं सोपा झाला. अशी चर्चा होती की, विखे-पवारांच्या ऐनवेळच्या युतीनं माजी मंत्री राम शिंदे बॅकफूटला गेले. शिंदे यांनी याच चर्चांवर फेसबुक पोस्ट लिहित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

काय म्हणाले राम शिंदे ?

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राम शिंदे म्हणाले, अहमदनगरच्या जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा संस्थेच्या मतदारसंघात भारतीय जनात पक्षाच्या वतीनं विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांना तिकिट दिलं होतं तर राष्ट्रवादीनं सुरेश भोसले यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवाराला सुचक मिळाला नाही. राळेभात यांचा मुलगा अमोल राळेभात यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर एकच सुचक होता. ज्यांच्या पक्षाला सुचक मिळाला नाही त्या पक्षाची अवस्था काय होती हे यावरून स्पष्ट होतं.

पुढं बोलताना शिंदे म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज छाननीत बाद झाला असताना आ. रोहित पवार यांनी राजकीय दबाव आणून तो मंजुर करून घेतला. त्यामुळं आमच्या उमेदवारावर पडणारा गुलाल काही दिवस लांबला. निवडणूक झाली तर दारुण पराभव होईल या भीतीनं आ. रोहित पवार यांनी आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. हा त्यांचा नैतिक पराभव असून त्याची आता सुरुवात झाली आहे असंही शिंदे म्हणाले आहेत.

जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात आणि त्यांचे पुत्र अमोल यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आ. रोहित पवारांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरवलं. यामुळं मेदानातील चुरस वाढली. सुरुवातीला राळेभात पिता-पुत्रांपैकी एकच अर्ज राहून बिनविरोध निवडणूक होईल असं चित्र निर्माण झालं होतं.

रोहित पवार यांनी सुरेश भोसले यांना अर्ज मागे घ्यायला लावला तसंच ऐनवेळी विखेंशी छुती युती करून राजकारणाचा नागरी पॅटर्न दाखवून दिला आहे. यामुळं माजी मंत्री राम शिंदे यांना चांगलाच धक्का बसल्याची चर्चा आहे.