पुन्हा होणार ‘रामायण’चं प्रसारण ! अरूण गोविल म्हणाले – ‘माझा नातूही माझ्यासोबत बघणार मालिका’ !

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपामुळं आता 24 मार्च 2020 पासून देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला आहे. अशात मनोरंजन विश्वातून मोठी आणि आनंदाची बातमी चाहत्यांना देण्यात आली होती. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोठी घोषणा करत सांगितलं की, दूरदर्शनवर रामानंद सागर यांचा 80 च्या दशकातील फेमस शो रामायणचं प्रसारण केलं जाणार आहे.

प्रकाश जावडेकरांनी ट्विट करत प्रेक्षकांना खुशखबरी दिली. त्यांनी ट्विट केलं आहे की, “जनतेच्या मागणीनंतर आता शनिवार दि 28 मार्च 2020 पासून रामायणचं पुन: प्रसारण दूरदर्शनवर केलं जाणार आहे. या मालिकेचा पहिला एपिसोड सकाळी 9 वाजता आणि दुसरा एपिसोड रात्री 9 वाजता प्रसारीत केला जाणार आहे.

रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना पुन्हा त्यांचा शो टेलीकास्ट केला जाणार आहे याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

https://youtu.be/wtv6-aFbiPY

अरुण गोविल म्हणाले, “रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेनं त्या काळात जनतेच्या मनात खास जागा तयार केली होती. आताही तसंच होणार आहे. मला वाटतं की, देवानं या शोला स्वत: आशीर्वाद दिला आहे. नाही तर एवढ्या वर्षांनंतरही हा परत का आणला असता. संकटसमयी देवाशी जोडलं जाणं आणि त्याला मदत मागणं गरजेचं असतं. जर आमच्या शोमधून लोकांना देवाची मदत मिळत असेल तर आणि काही शिकायला मिळत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे.”

पुढे बोलताना अरुण गोविल म्हणाले, “मला याचा सर्वाधिक आनंद आहे की, माझा नातूही हा शो पुन्हा पाहिल. मला त्यांनं टीव्हीवर पाहणं त्याला विचित्र वाटतं. खास करून तेव्हा जेव्हा मी त्याच्यासोबत बसलेला असेल. मी या गोष्टीमुळं आनंदी आहे की, प्रत्येक पिढीला रामायणासोबत जोडण्याची संधी मिळत आहे.” असंह ते म्हणाले.