लासलगाव जळीत प्रकरण : रामेश्वर भागवत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव महिला जळीत प्रकरणी पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ बाळा भागवत याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडित ठेवण्याचा आदेश तसेच पीडितेला बाटलीत पेट्रोल देणारा पेट्रोल पंपावरील कर्मचारी आकाश शिंदे यास 15 हजार रुपयांच्या जामीन मंजूर केल्याचा आदेश न्यायधीशी एस. बी. काळे यांनी दिला.

रामेश्वर भागवत यास यापूर्वी तीन दिवसाची पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्यास आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी आकाश शिंदे यास निफाड न्यायालयाचे न्यायाधीश एसबी काळे यांच्यासमोर लासलगाव चे तपासी अधिकारी खंडेराव रंजवे यांनी हजर केले होते. सरकारी पक्षाच्या वतीने एडवोकेट सुयोग आहेर तर आरोपीच्या वतीने एडवोकेट उत्तम कदम यांनी युक्तिवाद केला. येता पाच मार्चपर्यंत रामेश्वर भागवत यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मागील तारखेला सदर जळीत घटना ही सार्वजनिक ठिकाणी झालेली आहे. पोलिसांनी लावलेली कलमे ही जामीनपात्र आहेत.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पिडिता काहीही सांगत असली तरी तपास यंत्रणेने त्रयस्थ भुमिकेतुन भारतीय दंड विधान कलम 326 लावुन सखोल तपास करावा या करीता असे निर्देश न्यायालयाने दिले होते.

लासलगाव येथील बस स्थानकांवर शनिवारी दिनांक (१५फेब्रुवारी ) दुपारी कथित पती व विधवेच्या घरच्यांना झालेले दुसरे लग्न मान्य नसल्याच्या कारणाच्या वादातून झटापटीत पीडित महिला 67 टक्के भाजल्याची घटना घडली होती लासलगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवत सह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आले यात पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक व पेट्रोल देणाऱ्या कर्मचाऱ्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी मुख्य संशयित रामेश्वर भागवत याला दिनांक 17 फेब्रुवारी रोजी येवला येथून नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर निफाड न्यायालयात हजर केले असता त्यावर लावलेले सर्व कलम हे जामीनपात्र असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने सदर घटना सार्वजनिक ठिकाणी झाली असल्याची बाब समोर ठेवून ३२६ कलमही वाढवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले होते.