‘ममतांची भूमिका संघराज्याला धोकादायक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआय चौकशी विरुद्ध ममता बॅनर्जींची उपोषण करण्याची केंद्राविरोधीची भूमिका देशातील संघराज्य पद्धतीला धोकादायक असून ती चुकीची आहे असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. शारदा चिटफंड घोटाळ्याबाबत सीबीआय विरुद्ध पश्चिम बंगाल पोलिस याप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानुसार पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना शिलॉंगमध्ये सीबीआयसमोर हजर राहण्याचे आणि चौकशीला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या दुराग्रहाला दणका दिला आहे.

याबाबत बोलताना आठवले म्हणाले की, “शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी करण्यास गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना अटक करून सीबीआयला आणि केंद्रीय स्वतंत्र संस्थेच्या चौकशीच्या अधिकाराला आव्हान दिले आहे. केंद्र सरकारशी असहकार आणि विरोध करून पाश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतलेली भूमिका ही लोकशाहीत संघराज्य पद्धतीला धोकादायक आहे” असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे देशाला लोकशाही संघराज्य पद्धत दिली आहे. केंद्र सरकार आणि देशांतर्गत राज्य सरकार यांचे एकमेकांशी सहकार्य आणि सुसंवाद राहिला पाहिजे. ममता बनर्जींनी केंद्र सरकार आणि सीबीआयवर अविश्वास दाखवून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघराज्य पद्धतीला धोकादायक प्रघात निर्माण केला असून तो त्या रुजवू पाहत आहेत. या त्यांच्या संविधानविरोधी भूमिकेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करीत आहे” असे आठवले यांनी सांगितले.

तेव्हा ‘ते’ पाप न करण्याचं आश्वासन आईनं घेतलं होतं; नरेंद्र मोदींचा खुलासा 
अर्थव्यस्था सुधारण्यासाठी पाकिस्तान घेणार चक्क गाढवांची मदत