home page top 1

युतीने केला दलितांचा अपमान ! : ‘या’ आरपीआय नेत्याचे संतापजनक वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतीच शिवसेना-भाजप यांच्या युतीची घोषणा एका संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. आगामी निवडणुकांना एकत्र येऊन लढण्याचा विचार करत दोन्ही पक्षामध्ये युती झाली परंतु यात झालेल्या जागावाटपात आरपीआयला स्थान दिल्याचे दिसत नाही. यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाराज असल्याचे दिसत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) ला एकही जागा न दिल्याने त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आमची उपेक्षा केली गेली आणि दोन्ही पक्षांनी याबद्दल नक्की विचार करावा असे आठवेल म्हणाले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने संपर्क केला आहे पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत राहू इच्छितो असेही त्यांनी सांगितले.

याबाबत बोलताना आठवले म्हणाले की, “जर भाजपा आणि शिवसेनेने आरपीआय (अ) ला राज्यात एकही जागा दिली नाही तर माझ्या पक्षाला पुढे नेण्याच्या रणनितीवर विचार करावा लागेल. रिपब्लिकन पार्टीसाठी एकही जागा न सोडणे ही एक गंभीर बाब आहे. मी अजिबात समाधानी नाही. त्यांनी दलित समाज, आरपीआय आणि माझा देखील अपमान केला आहे. दलित समाजातून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.”

पुढे बोलताना आठवले म्हणाले की, “२०१४ मध्ये आमच्या पक्षासाठी साताऱ्यातील एक जागा सोडली होती. भाजपा आणि शिवसेनेला एकत्र यायला हवे हे मी सारखे म्हणत आलोय पण आरपीआयला विसरणे हे योग्य नाही. आमची महाराष्ट्रात ताकद आहे. आरपीआयच्या मतांमुळेच विजय मिळाला आहे. जर आम्ही सोबत राहीलो नसतो तर मोठं नुकसान झेलावे लागले असते. यासंदर्भात मी भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा मी स्वत: व्यक्त केली आहे. दोन्ही पक्षांना माझ्यासाठी जागा सोडावी लागेल.” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान लोकसभेच्या महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. आता युतीच्या झालेल्या ठरावानुसार आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपा २५ तर शिवसेना २३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. दोन्ही पक्षांनी आपापसातच जागावाटप केल्याने आठवलेंच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आठवलेंच्या पक्षाची गोची झाल्याचे दिसत आहे. एकही जागा न मिळाल्याने आठवलेंचा राग अनावर झाल्याचे दिसत आहे.

Loading...
You might also like