युती करताना विचारले देखील नाही :  रामदास आठवले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना पक्षांनी युती केली. मात्र युती होताना आपणाला विचारले नाही. कदाचित मी कुठे जात नाही, असे त्यांना वाटले असावे अशी नाराजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (रविवार) व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपण कोठे जाणार नाही असे वाटत असणार. रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) युतीत जागा न सोडल्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा भेटण्यासाठी निरोप होता असा गौप्यस्फोट आठवले यांनी केला.

लोकसभेसाठी स्वतःला दक्षिण अथवा ईशान्य अथवा उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघाची आणि आणखी एक जागा हवी. त्यासाठी भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी एक जागा सोडावी. यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असे सांगून आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप युतीसोबत आपण राहू इच्छितो, असेही स्पष्ट केले.