‘उद्धवजींचे सरकार ना रामाचे ना भीमाचे ना कामाचे’, आठवलेंची बोचरी टीका

पालघर : पोलिसेनामा ऑनलाईन – विक्रमगडच्या दिवेकर वाडी येथे रिपाइंच्यावतीने आदिवासी बहुजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या काव्यात्मक शैलीत उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. उद्धवजींचे सरकार ना रामाचे ना भीमाचे ना कामाचे अशी बोचरी टीका करत जातीनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आठवले यांनी केली. रामदास आठवले म्हणाले, सध्या मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. त्यांना आरक्षण देताना एससी, एसटी आणि ओबीसींच्या कोट्याचा विचार करू नये.

केंद्र सरकारने सवर्ण समाजातील गरिबांना १० टक्के आरक्षण देण्याच्या केलेल्या कायद्याला जोड देऊन देशातील मराठा, राजपूत आदी क्षत्रिय समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा संसदेत करावा असे ते म्हणाले. जातीवर आधारित आगामी जणगणना करावी. यामुळे जातीयता वाढणार नाही, तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार न्याय वाटा मिळेल.

विक्रमगड हा दुर्गम तालुका असून इथे पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. राज्य सरकारने मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना अद्याप वेतन दिलेले नाही. ही धक्कादायक बाब आहे. यातून महाविकास आघाडी सरकार काही कामाचे नसल्याचे दिसत आहे. भविष्यात राज्यात मोठी सामाजिक आणि राजकीय क्रांती होण्यासाठी रिपाइं आणि कुणबी सेना एकत्र आली पाहिजे. काही दिवसापासून पालघर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्याची मागणी होत असून, त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.