पार्श्वगायक मोहम्मद रफी यांना भारतरत्न द्या, रामदास आठवलेंची PM मोदींकडे मागणी

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन :  पार्श्वगायक मोहम्मद रफी यांना भारतरत्न द्यावा, अशी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. आठवले यांनी या मागणीचे पत्र पंतप्रधान यांना पाठवणार असल्याचे सांगितले आहे.

रामदास आठवले म्हणाले, मोहम्मद रफी यांच्या प्रभावामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अनेक गायक तयार झालेत. त्यामुळे मोहम्मद रफी यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा. तसेच महाराष्ट्र सरकारने रफींना भारतरत्न देण्यासाठीची शिफारस केंद्राकडे करावी. तसेच मी स्वत: पंतप्रधान यांना पत्र लिहून मोहम्मद रफींना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.

पद्मश्री मोहम्मद रफी यांंचा नुकताच 31 जुलै रोजी 40 वा स्मृतिदिन झाला. त्यानिमित्त रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि कपिल कला केंद्रचे कपिल खरवार यांनी राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली आणि दिवंगत पार्श्वगायक मोहम्मद रफी यांना भारतरत्न द्यावा, या मागणीचे निवेदन दिले आहे.