Video : रामदास आठवलेंचा ‘गो कोरोना गो’ नंतर आता ‘नो कोरोना नो’चा नवीन नारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ‘गो कोरोना गो’ची घोषणा केली. या घोषणेनंतर आठवले चांगलेच चर्चेत आले. त्यावर ते म्हणाले, मी गो कोरोना गो म्हणालो होतो. आता कोरोना जात आहे. पण आता कोरोनाचा नवा स्ट्रेन येत असल्यामुळे मी ‘नो कोरोना नो’ अशी घोषणा देत आहे. पण तो येणार नाही असे नाही, त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

पुणे श्रमीक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सरकार चालवताना मोठी कसरत होत आहे. महाविकास आघाडीतील बिघाडीमुळे काँग्रेस पक्ष एक दिवस पाठिंबा काढून घेईल. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्यासोबत येऊन सत्ता स्थापन करतील असा दावा आठवले यांनी केला.

https://www.instagram.com/tv/CJTilGZJxf1/?utm_source=ig_web_copy_link

काँग्रेस शेतकऱ्यांना फूस लावतेय
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चर्चेचे दार खुले ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवे शेतकरी कायदे रद्द करण्याचा हट्ट सोडावा. काँग्रेसने त्यांच्या जाहिरनाम्यात शेतकरी कायदा सुधारण्याचे आश्वासन दिले होते. पण आता तेच शेतकऱ्यांना फुस लावत आहेत.

भिडे, एकबोटे यांच्या कारवाईवर मूग गिळून गप्प
1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे नागरिकांनी गर्दी करु नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी घरी थांबावे. महाविकास आघाडी सरकार येऊन एक वर्षे झाले तरी भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

भाजपसोबत रिपाइ लढण्यास तयार
रिपाईची नव्याने सदस्य नोंदणी करण्याचे काम हाती घेतले आहे. 26 जानेवारी पर्यंत 20 लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत निवडणुका लढवण्यासाठी भाजप सोबत लढवण्यास रिपाइ तयार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे
राज्य सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात बाजू मांडता आलेली नाही. त्यामुळे एसईबीसी आरक्षणावर स्थगिती आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी आम्ही पूर्वीपासून करत आलो आहोत. त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.