‘क्षत्रियांची संख्या देखील मोठी, त्यांना देखील आरक्षण द्या’ : रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा, जाट, राजपूत आणि ठाकूर यांना महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात आरक्षण पाहिजे आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्षत्रिय लोक राहतात. ज्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले आहे. तसेच त्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संसदेत केली आहे.

ज्या प्रमाणे महाराष्ट्रात मराठा समाज लढत आहे. तसंच हरियाणात जाट, राजस्थानमध्ये राजपूत आणि उत्तर प्रदेशात ठाकूर समाजाला आरक्षण पाहिजे असल्याचे आठवले यांनी म्हटले. या राज्यामध्ये आरक्षणाची मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचे सांगून त्यांनी 2021 ची जनगणना जातीच्या आधारे झाली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला 8 मार्चापासून सुरुवात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. यावेळी न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जर 8 मार्चपासून सुनावणीला सुरुवात झाली नाही तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी होईल असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. तसेच या सुनावणीचा कालावधी निश्चित करण्यात आला असून 8 ते 18 मार्च दरम्यान ही सुनावणी होणार आहे.