‘ट्रम्प ज्या पक्षाचे, मी त्या पक्षाचा अध्यक्ष’ : रामदास आठवले

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारत दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि मी त्या पक्षाचा अध्यक्ष असल्याची मिश्किल टिप्पणी करत डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतात स्वागत आहे असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. रामदास आठवले कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यांग व उन्नती योजनेअंतर्गत दिव्यांगांना दिल्या जाणारे साहित्य आठवले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल काटरिया हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दौऱ्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त होती, असा दावा त्यांनी यावेळी केला.

महाविकास आघाडीवर टीका करताना रामदास आठवले म्हणाले. या सरकारमध्ये एकमत नाही. त्यामुळे हे सरकार फारकाळ टिकणार नाही. तसेच भाजप नेते नारायण राणे यांनी आठ दिवसात महाविकास आघाडीचे सरकार पडेल असा दावा केला आहे. नारायण राणे म्हणत आहेत म्हणजे तशा काहीतरी हालचाली सुरु असतील, असे रामदास आठवले म्हणाले.