मायावतींवर टीका करणाऱ्या माझ्या पक्षात असत्या तर त्यांच्यावर मी कारवाई केली असती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- उत्तर प्रदेशातील भाजप आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन टीका केली होती. या टीकेचे पडसाद मायवतींच्या कार्यकर्त्यांमध्येच नाही तर राजकीय वर्तुळात उमटत आहेत. साधना सिंह यांनी केलेल्या या टीकेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे. आमचा पक्ष भाजपसोबत आहे. मात्र आम्ही मायावतींविषयी असली भाषा खपवून घेणार नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मायावती या आमच्या दलित समाजातील खंबीर नेत्या आणि प्रशासक आहेत. मायावती यांच्याबद्दल असं वक्तव्य माझ्या पक्ष्यातील कोणी केले असते तर मी त्या व्यक्तीवर नक्कीच कारवाई केली असती, असं राम आठवले यांनी म्हटलं.

भाजप आमदार साधना सिंह यांनी चंदौली येथील सभेत मायावतींवर टीका केली होती. मायावती या पुरुष आहेत की, महिला हेच समजत नाही. सत्तेसाठी सन्मान विकणारी ही महिला तृतीयपंथीयांपेक्षाही वाईट म्हणायला हवी. ज्या महिलेचे चीरहरण होते, ती महिला कधीच सत्तेसाठी पुढे येत नाही. मात्र, मायवती यांनी खुर्चीसाठी हा सारा अपमान गिळला, अशी टीका साधना सिंह यांनी केली होती.

दरम्यान, रामदास आठवले यांचा भारतीय रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा मित्र पक्ष आहे. मायावती भाजपच्या विरोधक आहेत. भाजपच्या आमदारानेच मायावतींवर ही खालच्या पातळीची टीका केली. त्यावर रामदास आठवलेंनी व्यक्त केलेला संताप, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.