प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार ! रामदास आठवलेसह अमृता फडणवीस यांच्याकडून कंगनाची पाठराखण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री कंगना रणौत राजकीय नेत्यांसह अनेकांच्या निशाण्यावर आहे. मात्र कंगनाच्या पाठिशीही काहीजण उभे राहत आहेत. रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगनाची पाठराखण केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना रणौतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणार्‍या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना रणौतला आरपीआय संरक्षण देईल, असे आठवले यांनी म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांनी देखील कंगनाची बाजू घेतली आहे. एखाद्याच्या म्हणण्याशी आपण सहमत नसू, मात्र लोकशाही व्यक्त होण्याचा, मत मांडण्याच्या अधिकाराचे रक्षण केले पाहिजे. भाषणाचे स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य, पत्रकारितेचे स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. एखाद्याच्या मताचा आपण प्रतिवाद करुन शकतो, मात्र टीकाकारांच्या पोस्टर्सना चप्पल मारणे खालच्या पातळीचे लक्षण आहे, असे म्हणत अमृता यांनी कंगना रणौतला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते.