रामदास कदम यांना शिवसेनेकडून पगार दिला जातो – निलेश राणे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – खासदार संभाजीराजे यांनी नारायण राणे यांची स्तुती केली होती. ‘मराठा आरक्षणाचं श्रेय नारायण राणे यांचं’, असल्याचं वक्तव्य संभाजीराजे यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी, ‘कुणाची लाचारी करू नका’, असं संभाजी राजेंना उद्देशून वक्तव्य केलं होतं. यावरून निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली.
महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘रामदास कदम यांनी स्वत: मराठा आरक्षणासाठी काही केलं नाही, मुळात ते ‘मातोश्री’चे पगारी नेते आहे’, अशा शब्दांत राणे यांनी टीका केली आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
‘रामदास कदमांना दुसरं काय काम आहे?, त्यांनी स्वतः मराठा आरक्षणासाठी काही केलं नाही. आता त्यांच्या पोटात का दुखतंय’, असा सवाल निलेश यांनी विचारला आहे.
‘रामदास कदम हे ‘मातोश्री’ चे पगारी नेते आहे. त्यांना नारायण राणेंवर बोलायचं टार्गेट दिलं आहे. पण ही लोकं काय म्हणतात, त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही’, असं सांगत निलेश राणेंनी कदम यांची नक्कल करत खिल्लीही उडवली. या आधीही नितेश राणे आणि रामदास कदम यांचा वाद चांगलाच रंगला होता.
मोदी लाट असतांना महाराष्ट्रात शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले होते. आणि आता त्यांच काहीच नाही. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात येऊन कोणीही शिवसेनेला आव्हान दिल तर आम्ही त्याला गाडून टाकू असा इशारा शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दिला.
त्यानंतर राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ‘उद्धव ठाकरे मराठवाड्यासाठी तुम्ही काय घेऊन गेला आहात?, मुळात उद्धव हे शेतकऱ्यांसाठी नाही तर मतांची भीक मागायला गेले आहे’, अशी टीका त्यांनी केली.
‘आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या 5 जागा पण येणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.