रेमडेसिवीरचा काळाबाजार : शासकीय रुग्णालयातील ब्रदर, प्रयोगशाळेचा तंत्रज्ञाला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना रुग्णांना आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नाही. रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जावणत असून रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड होत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना रेमडेसिवीरचा काळाबाजार करताना रंगेहाथ पकडले आहे.

सुमित सुधीर हुपरीकर (रा. समृद्धीनगर, विश्रामबाग सांगली) आणि दाविद सतीश वाघमारे (रा. कुपवाड रोड, विजयनगर, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सुमीत हा सिव्हीलमधील ब्रदर तर दाविद वाघमारे हा विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयातील लॅब असिस्टंट म्हणून काम करत आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.25) रात्री उशीरा करण्यात आली.

कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. या स्थितीत रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस काळाबाजार करणाऱ्याचा शोध घेत होते. यावेळी सुमित आणि दाविद या दोघांना रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या किंमतीत विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांनी यापूर्वी इंजेक्शन चोरून विकली आहेत. एक इजेक्शन 30 हजार रुपये असे दोन इंजेक्शन 60 हजार रुपयांनी विकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.