यंदा IIT मध्ये अ‍ॅडमिशन घेण्याची प्रक्रिया होणार आणखीच सोपी, HRD मंत्र्यांकडून घोषणा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शुक्रवारी घोषणा केली की, कोरोनामुळे विविध बोर्डांद्वारे 12वीची परीक्षा आंशिकदृष्ट्या रद्द केल्यामुळे यावर्षी भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) प्रवेशाच्या नियमांमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

एचआरडी मंत्री निशंक यांनी याबाबत ट्विट केले आहे. निशंक यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई अ‍ॅडव्हान्स पास होण्याशिवाय 12वी बोर्डाच्या परीक्षेत किमान 75 टक्के गुण प्राप्त करावे लागत होते, किंवा पात्रता परीक्षेत प्रमुख 20 पर्सेंटाइलमध्ये स्थान मिळवावे लागत होते.

निशंक यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, बोर्डाद्वारे 12वी वर्गाची परीक्षा आंशिकदृष्ट्या रद्द करण्यामुळे संयुक्त नामांकन बोर्डाने (जेएबी) यावेळी जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 पास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश नियमांमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

एक अन्य ट्विटमध्ये निशंक यांनी लिहिले की, ‘असे पात्र उमेदवार ज्यांनी 12वीची परीक्षा पास केली आहे, ते प्रवेशासाठी पात्र असतील, आणि त्यांना मिळालेल्या गुणांमुळे कोणताही फरक पडणार नाही.

यापूर्वी माहिती समोर आली होती की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा सिलॅबस कमी करणे आणि प्रवेश परीक्षा फॉर्मेट बदलण्याबाबत चर्चा करेल. यावर्षी, आयआयटी दिल्ली जेईई अडव्हान्स परीक्षा घेण्याची तयारी करत आहे.