आनंद थोरातांना राष्ट्रवादीकडून विधानसभेची उमेदवारी मिळणार ? रमेश थोरातांच्या ‘त्या’ विधानामुळं धनगर समाजामध्ये उत्साह

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळाले नाही तरी बंडखोरी करणार नाही असे विधान पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दौंडमधील एका सभेमध्ये केल्याने धनगर समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दौंड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनगर समाजाचे नेते आनंद थोरात हे प्रबळ दावेदार असल्याने त्यांना राष्ट्रवादीकडून आता खरेच उमेदवारी मिळणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

आनंद थोरात हे धनगर समाजाचे नेते असून त्यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे ते पुत्र असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी दौंड विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज दाखल केला आहे. दौंड तालुक्यातील धनगर समाजासह इतर समाजातही त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांचे सामाजिक कार्य मोठे असून त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. परखड स्वभाव, साधे सोपे राहणीमान, स्वच्छ चारित्र्य आणि नम्र आचरण हि त्यांची मोठी जमेची बाजू आहे. आनंद थोरात यांनी कायमच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी साथ दिली असून लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी घरोघरी जाऊन केलेल्या प्रचारामुळे खा.सुप्रिया सुळे यांना त्याचा मोठा फायदा झाल्याचे सर्वश्रुत आहे.

त्यांचे वडील काकासाहेब थोरात हे मुंबईच्या नेहरूनगरमध्ये १९८० च्या दशकामध्ये विधानसभेची निवडणूक लढवून निवडून आले होते. दौंड तालुक्यामध्ये धनगर समाजाचे निर्णायक मतदान असल्याने आनंद थोरात यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास विद्यमान आमदार राहुल कुल यांना मोठे आव्हान निर्माण होणार आहे. आ.राहुल कुल आणि आनंद थोरात या दोघांनाही राजकीय वारसा लाभलेला आहे. आनंद थोरात यांना उमेदवारी मिळाल्यास दौंड तालुक्यातील धनगर समाजासह इतर समाजाचाही मोठा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतो आणि याचा मोठा फायदा येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

दौंड तालुक्यामध्ये कुल आणि थोरात हे दोनच गट आत्तापर्यंत प्रबळ मानले जात होते परंतु आनंद थोरात हेही आता प्रबळ नेत्यांच्या पंक्तीत येऊन बसले असून मागील वर्षी त्यांच्या वाढदिवसाला झालेले शक्ती प्रदर्शन हे कुल आणि थोरात यांना विचार करायला लावणारे होते. राष्ट्रवादी काँग्रेसने आनंद थोरात यांना उमेदवारी दिल्यास सर्व गट-तट आणि पक्षभेद बाजूला ठेऊन धनगर समाज मोठ्या ताकदीने त्यांच्या मागे उभा राहून त्यांना निवडून देईल अशी प्रतिक्रिया धनगर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून दिली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like