रामगोपाल यादव यांचं वक्तव्य घाणेरड्या राजकारणाचं उदाहरण 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर उत्तर प्रदेशातील समाजवादी नेते रामगोपाल यादव यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. या हल्ल्याची चौकशी केल्यास बड्या नेत्यांची पोलखोल होईल असा खळबजनक आरोप केला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रामगोपाल याद यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

रामगोपाल यादव यांचे वक्तव्य घाणेरड्या राजकारणाचे उदाहरण आहे. त्यांनी सीआरपीएफ जवानांच्या हौतात्म्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे, तसेच देशाच्या जवानांच्या मानसिक खच्चीकरण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी देशाची माफी मागितली पाहिजे असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

‘मतांसाठी पुलवामात जवानांवर हल्ला घडवून आणण्यात आला, त्यामुळे अर्धसैनिक दले सरकारवर नाराज आहेत. जवानांना घेऊन इतका मोठा ताफा महामार्गावरुन जात असताना जम्मू-श्रीनगर दरम्यान तपासणी झाली नाही. तसेच या जवानांना साध्या बस मधून रवाना केले जात होते. त्यामुळे हा सगळा कट होता’, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, या कटात कोण सामील होतं हे मी आत्ता सांगू इच्छित नाही. मात्र, सरकार बदलल्यानंतर याची जेव्हा चौकशी होईल तेव्हा बड्या नेत्यांची पोलखोल होईल, असे यादव यांनी म्हटले आहे.