भाजपाला दलितांची मतं हवी मात्र दलित नेता नको : भाजप खासदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही उमेदवारी पाहिजे होती. त्यांना दिली नाही. परंतु ते शांत बसले म्हणून त्यांना राष्ट्रपती बनवण्यात आले. भाजपाला दलितांची मतं हवी मात्र दलित नेता नको. असा आरोप नुकताच भाजप मधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाजपाचे खासदार उदित राज यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या २९ एप्रिलला होणार आहे. याचदरम्यान, दिल्ली उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपचे खासदार उदित राज यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदित राज यांनी भाजपवर हल्लाबोल करत आरोपही केले. भाजपा ही एक दलित विरोधी पार्टी असून भाजप मागासवर्गीय विरोधी पार्टी असल्याचा आरोप त्यांनी केला.

याचबरोबर भाजपाने जर तिकीट दिले असते तर त्यांच्याकडून लढलो असतो. मात्र २ एप्रिल २०१८ मध्ये जेव्हा दलित रस्त्यांवर उतरले होते, तेव्हा मी त्यांना समर्थन दिले होते. त्यामुळे माझे तिकीट कापण्यात आले. असा आरोपही त्यांनी केला. इतकेच नव्हे तर, २०१४ मध्ये सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही उमेदवारी हवी होती. मात्र भाजपने दिली नाही. त्यावेळी माझ्यासाठी काहीतरी करा असे ते सांगत होते. ते शांत बसले म्हणून त्यांना राष्ट्रपती पद देण्यात आले. असा आरोपही त्यांनी केला. तसेच मी देखिल शांत बसलो असतो तर मलाही पंतप्रधान बनवले असते. मात्र, मी मुका आणि बहिरा बनून राहू शकत नाही असेही त्यांनी म्हंटले.