‘सपा’चे दिग्गज नेते आजम खान यांची पत्नी आणि मुलासह 3 दिवसांसाठी जेलमध्ये रवानगी, रामपुर कोर्टाचा आदेश

रामपुर : वृत्तसंस्था – समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान, त्यांची पत्नी तंजीम फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आजम खान यांना दोन मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. आझम खान आपल्या कुटुंबासमवेत आज रामपूरच्या एडीजी 6 कोर्टात हजर झाले होते. कोर्टाने आझम खान आणि त्यांच्या कुटुंबाला कोर्टात हजर राहण्याचे आदेश बऱ्याचवेळा दिले होते. मात्र, ते कोर्टात हजर होत नव्हते.

बनावट जन्म प्रमाणपत्राप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर आज (बुधवार) तिघेजण न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावत तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी दोन मार्च रोजी होणार आहे. रामपुरच्या विशेष कोर्टाने मंगळावारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

भाजपचे नेता आकाश सक्सेना यांनी मागील वर्षी ही रामपूर न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी आरोप केला आहे की अब्दुल्ला यांचे दोन जन्म प्रमाण पत्र बनवले आहेत. एक जन्माचा दाखला रामपूरचा तर दुसरा लखनऊचा असल्याचे याचिकेत म्हटले आहे.