स्ट्राँगरुममधून चोरलेले DVR चोरांनी परत आणून दिले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी नागपूर येथील रामटेक लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुममधून DVR चोरटयांनी पळवून नेल्याची घटना घडली होती. मात्र आता चोरटयांनी हे डीव्हीआर परत केल्याची माहिती मिळते आहे. चोरांनी डीव्हीआर परत केल्यामुळे अनेकांनी भुवया उचंवल्या आहेत.

नेमके प्रकरण काय ?
उमरेडच्या स्ट्रॉंगरुममधील १२ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीतील फूटेज असणारा सीसीटीव्ही यंत्रणेतील डीव्हीआर आणि दोन मॉनिटर चोरीला गेल्याचं उघड झालं होतं. मात्र आज सकाळी तो डीव्हीआर त्याच खोलीतील एका खुर्चीवर आणून ठेवल्याचे आढळले. हा चोर कोण आहे, डीव्हीआरमधील सीसीटीव्ही फूटेज तसेच आहेत, की त्यासोबत छेडछाड झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान रामटेक लोकसभा मतदार संघात ११ एप्रिल रोजी मतदान झाले. मतदानानंतर या क्षेत्रातील सर्व ईव्हीएम मशिन्स नियमानुसार उमरेडच्या तत्परत्या स्ट्राँगरुममध्ये गोळा करण्यात आली होती. १२ एप्रिल रोजी संध्याकाळी सर्व ईव्हीएम नागपूरच्या मुख्य स्ट्रॉंगरुममध्ये पाठवण्यात आली. मात्र १२ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान उमरेडच्या त्या स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही फुटेज असणारा डीव्हीआर चोरीला गेला होता.

फेरमतदान घेण्याची मागणी
डीव्हीआर चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला. चोरीला गेलेला डीव्हीआर शोधा, नाहीतर मतदारसंघात फेरमतदान घ्या, अशी मागणी रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी केली आहे. चोरीला गेलेल्या डीव्हीआर संदर्भात एफआयआर दाखल करुन ते तात्काळ शोधण्याची मागणी त्यांनी केली होती.

डीव्हीआर म्हणजे काय ?
डीव्हीआर म्हणजे डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर डीव्हीआरच्या माध्यमातून सिक्युरिटी व्हिडिओ इमेजेस हार्ड डिस्कमध्ये साठवता येतात. डीव्हीआर हा अ‍ॅनलॉग सिग्नल्स डिजिटल स्वरुपात कन्व्हर्ट करतो. अनेक कॅमेरे एका डीव्हीओशी जोडता येऊ शकतात. डीव्हीआरला साधरणत ४, ८, १६ किंवा ३२ कॅमेरा आऊटपुटसोबत जोडलं जातात.