अहमदनगर : महापालिकेवर रामवाडी झोपडपट्टीवासीयांचा मोर्चा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – रामवाडी झोपडपट्टीत दहशत निर्माण करुन लॅण्ड माफिया जागा बळकाविण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या निषेधार्थ सार्वजनिक शौचालया जवळील रस्त्यावर रात्रीतून उभे करण्यात आलेले पत्र्याचे अनाधिकृत शेडचे अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनाबाहेर ठिय्या देत त्यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे, विकास उडाणशिवे, सोमनाथ लोखंडे, अनिल पाथरे, नितीन साबळे, सुभाष दिवटे, गंगाराम शेलकर, अक्षय केंजरला, बंटी साबळे, राजू दिवटे, पप्पू पाटील, विनोद घोरपडे, अनिल वाघचौरे, विक्रम पठारे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

रामवाडी झोपडपट्टीमध्ये सार्वजनिक शौचलया समोर 40 ते 50 वर्षापासून कचराकुंडी आहे. महापालिकेच्या वतीने येथील कचरा देखील नियमित संकलित केला जातो. या भागातील रस्त्यावरुन नागरिक मार्गक्रमण करीत असतात. तसेच येथील सार्वजनिक शौचालयाचा महिला व पुरुष वापर करीत आहे. लॅण्ड माफियांच्या सांगण्यावरुन काही गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांनी सदर ठिकाणची कचरा कुंडी हटवून त्या ठिकाणची जागा बेकायदेशीरपणे बळकाविण्याचा प्रयत्न चालवला आहे. या ठिकाणी रात्रीतून पत्र्याचे शेड उभारण्यात आले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

रामवाडी झोपडपट्टीत 800 ते 900 कुटुंब राहत असून, या ठिकाणी कचरा संकलित केला जातो. तसेच गुंडप्रवृत्तीचे लोक पत्र्याचे शेड उभारत असताना महिलांना या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयात देखील जाण्यास घाबरत आहे. या ठिकाणचा रस्ता करण्याची नागरिकांनी अनेक वेळा मनपा प्रशासनाकडे वारंवार मागणी देखील केली आहे.

या अतिक्रमणाने रस्ता, कचराकुंडी व सार्वजनिक शौचालयाचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याने सदरील अनाधिकृत अतिक्रमण तातडीने काढण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आयुक्त भालसिंग यांना देण्यात आले. अतिक्रमण त्वरीत न हटविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून, यासंदर्भात कायदेविषयी प्रश्‍न निर्माण झाल्यास याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.

Visit :  Policenama.com