Lalu Yadav Health Update : लालू यादव यांची प्रकृती बिघडली, चांगल्या उपचारासाठी पाठवले जाणार AIIMS मध्ये

रांची : वृत्तसंस्था – आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांना चांगल्या उपचारासाठी दिल्ली एम्समध्ये पाठवण्यात येणार आहे. रिम्स मेडिकल बोर्डाने बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेतला. रिम्सने याबाबत होटवार जेल प्रशासनाला सुद्धा माहिती दिली आहे. जेल अधीक्षकांनी यास दुजारो दिला आहे.

गुरुवारी सायंकाळपासून लालू यादव यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांच्या चेहर्‍यावर सूजसुद्धा आहे. शुक्रवारी त्यांची भेट घेतल्यानंतर मुलगा तेजस्वी यादव यांनी वडील लालू यादव यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. त्यांना चांगल्या उपचारासाठी दुसरीकडे हलवले जावे, असे आम्हा वाटते, असे ते म्हणाले होते.

लालू प्रसाद यांच्या फुफ्फुसात पाणी झाल्याची माहिती देत तेजस्वी यादव यांनी म्हटले की, त्यांची स्थिती चिंताजनक आहे. क्रिएटनीन सुद्धा वाढले आहे. तेजस्वी यादव सध्या रांचीमध्ये आहेत. आज ते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेऊन वडीलांच्या प्रकृतीबाबत सांगतील.

या दरम्यान, राबडी देवी, मुलगी मीसा भारती यांच्या सोबत आज पुन्हा रिम्समध्ये पोहचल्या आहेत. दोघी मायलेकी राजद सुप्रीमो लालू प्रसाद यांची भेट घेत आहेत. यापूर्वी शुक्रवारी रात्री 6 तासांपेक्षा जास्त वेळेपर्यंत येथे थांबल्यानंतर राबडी देवी खुप भावूक झाल्या होत्या. मात्र, लालू यादव यांनी त्यांना विश्वास दिला की ते लवकरच बरे होतील. यावेळी मुलगी मीसा भारती, तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव सुद्धा उपस्थित होते.

रिम्स प्रशासनाने लालू यादव यांच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी मेडिकल बोर्ड गठित केले होते. यामध्ये विविध विभागाचे 8 डॉक्टर आहेत. मेडिकल बोर्डाने थोड्यावेळापूर्वी बैठक घेऊन हा निर्णय घेतला की, लालू यादव यांना चांगल्या उपचारासाठी दिल्ली एम्समध्ये पाठवले जाईल.