‘लॉ’च्या विद्यार्थीनीच्या गँगरेप प्रकरणी 11 दोषींना शेवटच्या श्वासापर्यंत कैद, 100 दिवसांमध्ये आला निकाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉ विद्यार्थिनीच्या सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषी असलेल्या ११ जणांना शेवटच्या श्वासापर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच ५०-५० हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे. यापूर्वी २६ फेब्रुवारी रोजी न्यायाधीश नवनीत कुमार यांनी या सर्वांना दोषी ठरवले होते. शिक्षा सुनावणीसाठी २ मार्चची तारीख निश्चित करण्यात आली होती. सोमवारी शिक्षा सुनावण्याच्या घोषणेदरम्यान राज्याचे डीजीपी कमल नयन चौबे देखील न्यायालयात उपस्थित होते.

 

या प्रकरणात एक अल्पवयीन आरोपीचा (Minor accused) खटला बाल न्याय मंडळामध्ये सुरू आहे. सामूहिक बलात्काराच्या या प्रकरणात न्यायालयाने १०० दिवसांच्या आत सुनावणी पूर्ण केली आहे. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी राजधानीच्या कांके भागातील संग्रामपूरमध्ये एका लॉ विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात दुसर्‍याच दिवशी पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली होती.

पोलिसांनी तातडीने प्रकरणाचा तपास करत २४ दिवसांच्या आत न्यायालयात चार्टशीट दाखल केली होती. न्यायालयात फिर्यादीद्वारे २१ साक्षीदारांना हजर करण्यात आले. त्याचवेळी बचावासाठी एकही साक्षीदार नव्हता. सुनावणी दरम्यान डीएनए चाचणी, वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्डसह अनेक पुरावे कोर्टासमोर सादर करण्यात आले. आरोपींमध्ये कुलदीप उरांव, सुनील उरांव, संदीप तिर्की, अजय मुंडा, राजन उरांव, नवीन उरांव, बसंत कच्छप, रवी उरांव, रोहित उरांव, सुनील मुंडा, ऋषि उरांव आणि एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

अपहरण करून केला सामूहिक बलात्कार

पीडित विद्यार्थिनी आपल्या एका मित्राबरोबर बसस्टॉपवर बसून बोलत होती. या दरम्यान एका अल्टो कारमध्ये सवार असलेले सहा तरुण तेथे आले आणि विद्यार्थिनीची छेड काढू लागले. सर्व तरुण नशेत होते आणि त्यांच्याकडे शस्त्रे देखील होती. विद्यार्थिनीच्या मित्राने त्यांचा विरोध केला. यावर आरोपींनी त्याला मारहाण केली. त्यानंतर मुलीला शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने गाडीमध्ये बसवले आणि जवळच्या खेड्यातील एका विटभट्टीजवळ नेण्यात आले आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

पोलिसांनी चोवीस तासांत आरोपीला केली अटक

सामूहिक बलात्कारामूळे पीडिता बेशुद्ध पडली होती, परंतु त्यानंतरही नराधमांचे मन भरले नाही, त्यांनी आपल्या अजून सहा साथींना बोलावले. त्यांनी देखील पीडित मुलीवर बलात्कार केला. नंतर पीडिता शुद्धीवर येताच आरोपींनी तिला त्याच बसस्थानकावर आणून सोडले आणि तेथून सर्व आरोपी फरार झाले. पीडित विद्यार्थिनीने तिच्या मित्राच्या मदतीने कसेबसे कांके पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक केली होती.