पोलिस ठाण्यातच महिला ‘ठाणेदार’ घेत होती लाच, पुढं झालं ‘असं’ काही

रांची : व्रतसंस्था – रांचीमध्ये अँटी करप्शन ब्यूरोच्या टीमने महिला ठाणे प्रमुख संगीता झा यांना २० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. जेव्हा त्यांना अटक करण्यात आली तेव्हा त्या बंडू पोलीस स्टेशनमध्येच आपल्या गणवेशात होत्या. सुलामी हेरेंज असं तक्रार केलेल्या महिलेचे नाव आहे.

सुलामी यांनी सांगितले की, बंडू ठाण्याच्या ठाणे प्रमुख रात्री दहा वाजताच्या आसपास माझ्या घरी आल्या आणि सांगितले की बंडू ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार आहे, सकाळी ठाण्यात येऊन भेटा. त्यानुसार सुलामी मुलाला घेऊन सकाळी ठाण्यात पोहचल्या. तेव्हा या ठाणे प्रमुखांनी मदत करण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केली. नाही म्हटल्यावर ठाणे प्रमुखांनी मुलाला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यावर या महिलेने या गोष्टीची तक्रार एसीबी मध्ये केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचत या ठाणे प्रमुख महिलेला अटक केली.

ज्या महिलेने ठाणे प्रमुखाविरोधात तक्रार केली होती. त्या महिलेविरोधात बंडू ठाण्यात गर्भपात केल्याचा आरोप आहे. रांची मधील एका गावात प्रेम संबंधातून एक मुलगी गरोदर झाली होती. यात त्यामुलीने मुलाला लग्नासाठी विचारल्यावर या मुलाने मुलीला या महिलेकडे नेऊन गर्भपात करून घेतला होता. त्यानंतर त्यामुलीला सोडून तेथून पळून गेला. या मुलीने बंडू ठाण्यात तक्रार केली. त्याच वेळेस त्या महिलेचेही नाव घेतले होते. या केसमुळे ठाणे प्रमुख महिलेने या महिलेला लाच मागितली होती.

दरम्यान, एसीबीच्या डीएसपी वैद्यनाथ प्रसाद यांनी सांगितले की हा सापळा रांचीमधील या वर्षातील ८वा सापळा होता. यात सरकारी अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले आहे.

You might also like