राणे , मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या पाठिंब्याने खासदार झालेले नारायण राणे सध्या युती झाल्यापासून भाजपवर रुसले आहेत. त्यांनी स्वाभीमान पक्षातर्फे लोकसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढविण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता प्रथमच नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी या विमानतळाचे मंगळवारी उद्घाटन होत आहे. या समारंभात ते एकत्र येणार आहेत.

सिंधुदुर्ग विमानतळाचे आचारसंहिता लागण्यापूर्वी उद्घाटन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी घाई केली आहे. कोकणला हवाई मार्गे जोडण्यासाठी उडान अंतर्गत विमान सेवा देणाऱ्या कंपनीची घोषणा २५ फेब्रुवारीला होणार होती. पण ती अद्याप झालेली नाही़ याची निविदाही अद्याप घोषित झालेली नाही. असे असताना या विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, नारायण राणे उपस्थित राहणार आहेत.

हे विमानतळाचे उद्घाटन नाही तर इमारतीचे उद्घाटन आहे . अशी टिका नारायण राणे यांनी केली होती. त्यामुळे आता या कार्यक्रमात राणे काय बोलतात व फडणवीस याला कसे उत्तर देतात, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.