जेजुरी गडावर पारंपारिक रंगपंचमी साजरी

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – ‘पिवळा रंग लेउनी सदा दंग झालो मल्हारीचा’ अशा स्वरूपाचे खंडेरायाचे लोकगीत प्रसिद्ध आहे, सदैव पिवळ्या भंडाऱ्यामध्ये न्हालेल्या मल्हारी मार्तंडाचे रंगपंचमीच्या दिवशीचे रूप मनमोहक दिसत होते. सोन्यासारख्या पिवळ्या दिसणाऱ्या भंडाऱ्यामध्ये कायमस्वरूपी न्हालेल्या कुलस्वामी खंडेरायावर आज सप्तरंगी रंगाची उधळण करण्यात आली.

पहाटे ब्राम्हमुहूर्तावर मंदिराचाे द्वार उघडले ते सदानंदाचा येळकोटच्या गजरामध्येच.. पहाटेच्या तोंडधुनीच्या महापूजेची लगबग सुरू असतानाच पुजारी, नित्य वारकरी सेवेकरींची लगबग सुरू झाली ती मंदिराचे गर्भगृह विविध रंगांनी रंगवण्यासाठी. महापूजेची तयारी झाल्यानंतर मंजुळ भूपाळीच्या स्वरात देवाला पंचामृत स्नान, विविध रंगातील क्षिराभिषेक, विविध सुगंधीत जलाने स्नान घालण्यात आले. त्यानंतर सर्वानी श्रीमल्हारी मार्तंडावर भंडाऱ्यसोबतच विविध रंगांची उधळण करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी पुजारी सेवेकरी नित्य वारकरी आणि मेघमल्हार प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध रंगांनी रंगविले होते. तसेच पुण्यातील रंगावलीकार आशा खुडे यांनी मध्यगर्भगृहामध्ये श्रीमार्तंडाची पोट्रेट रांगोळी काढली.

शिशिर ऋतूतील पानगळ संपून वसंत ऋतू मध्ये निसर्ग विविध रंगीबेरंगी फुलांच्या आणि पालवीच्या माध्यमातून रंगीबेरंगी उधळण करीत असतो, तर दुसरीकडे होळी नंतर उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते अशा वातावरणात एकरूप होण्यासाठी रंगपंचमीचा सण साजरा करण्याची आपली परंपरा आहे. म्हणूनच श्रीमल्हारी मार्तंडाला विविध सुगंधित रंगांनी रंगवून हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो असे अण्णाश्री उपाध्ये गुरुजी यांनी सांगितले. यावेळी मंदिरामध्ये पुजारी, सेवक, देवस्थान कर्मचारी, नित्य वारकरी आणि मेघमल्हार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.