kolhapur News : रंगपंचमी खेळून पोहायला गेलेल्या चौघांचा मृत्यू, प्रचंड खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – रंगपंचमीच्या आनंदावर विरजण टाकणाऱ्या तीन धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडल्या आहेत. रंग खेळून मित्रासमवेत पोहण्यासाठी गेले असता 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि. 2) घडलेल्या या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

यशराज राजू माळी (वय 16 रा. शिंगणापूर, ता. करवीर ) असे खाणीत बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सध्या तो 10 वीत शिकत होता. सकाळी उठून मित्रासोबत रंगपंचमी साजरी केली. त्यानंतर तो आंघोळीसाठी गणेशनगर भागातील खाणीत गेला. खाणीत उडी मारल्यावर तो गाळात रुतल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला.

दुसर-या घटनेत कोडोली (ता.पन्हाळा) येथील दोघे मुले विहिरीत बुडाल्याची भिती व्यक्त होत आहे. शिवराज कृष्णा साळोखे (वय 14) व शुभम लक्ष्मण पाथरवट (वय 14 रा. दोघेही कोडोली, ता.पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. रंगपंचमी खेळून झाल्यानंतर पाच-सहा मित्रांसोबत अकराच्या सुमारास ती वैभवनगर परिसरातील विहिरीत आंघोळीसाठी गेले होते. कपडे काढून ते विहिरीच्या कठड्यावरच बसले होते. परंतू त्यांचा तोल जावून ते विहिरीत कोसळले.

या दोघांनाही पोहता येत नव्हते. शिवराज साळोखे नववीत शिकत होता. त्याचे वडिल शेतकरी असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. शुभमची आई शिलाई मशिन चालवून त्याचे संगोपन करत होती. सामान्य गरिब कुटुंबातील या दोघांच्या मृत्यूने गावांवर शोककळा पसरली. दरम्यान, कुरुंदवाडमध्येही विहीरीत पोहण्यास गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे झाल्याचे समजते. अद्याप त्याचे नाव समजू शकले नाही.