नियमाचं उल्लंघन करणाऱ्या बसेसवर रांजणगाव MIDC पोलिसांची कारवाई, बस जप्त करत केला दंड वसुल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना साथरोग नियमांचे उल्लंघन करत अधिक प्रवासी कामगारांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चांगलाच दणका दिला असून तीन बसेस जप्त करत सुमारे 30 हजार रुपये दंड वसूल केला आहे.

राज्यात सर्वत्र कोरोना महामारी च्या अनुषंगाने सर्वत्र कडक अंमलबजावणी सुरू आहे. रांजणगाव MIDC मध्यील कामगारांची ने आण करणाऱ्या बस करिता जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार बस मधील आसन क्षमतेच्या 50% प्रवासी बसवणे गरजेचे आहे. जेणे करून कोरोना सारख्या साथीच्या रोगाचा प्रसार होणार नाही. कोरोना रोगाला आळा बसण्यास मदत होईल असे आदेश असताना काही बस चालक, मालक नियमाचे पालन न करता जादा कामगार बसवून त्यांची ने आण करत आहेेत.रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत अशा प्रकारे अधिक कामगार ने आण करताना तीन बसेस मिळून आल्याने त्या बसचालकांना प्रत्येकी १०,०००/- रुपये दंड करण्यात आला. असून ०३ बस वर‌ कारवाई करून ३०,०००/- दंड करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक फौजदार अनिल चव्हाण, पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, पोलीस अमलदार उमेश कुतवळ, पोलीस अमलदार आबासाहेब नाईक, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री जाधव यांच्या पथकाने केली असून यापुढील काळात ही शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर रांजणगाव MIDC परिसरात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सर्व चालक-मालक यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, कामगारांचे जीव धोक्यात घालू नये असे आवाहन पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी केले आहे.