बारामतीला मिळाली नवी ओळख, शरद पवार पुन्हा मैदानात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी सर्वात जवळच्या आहेत. त्यामुळे ते नेहमीच मैदानात वेगेवेगळ्या रूपात दिसतात. मात्र, शरद पवार पहिल्यांदाच बारामतीच्या मैदानात दिसले. याच बारामतीच्या बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आज पहिला रणजी सामना खेळवण्यात आला.

बारामतीच्या या क्रिकेटच्या मैदानावर खेळाला जाणारा महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड हा पहिला रणजी सामना पाहण्याकरिता शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील उपस्थित राहिल्या होत्या. सामना सुरु होण्याआधी शरद पवारांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला, त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंचे पवारांसोबत फोटोसेशन झालं. शरद पवारांनी स्वत: सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केले. पवारांनी या फोटोला कॅप्शन देत लिहिले कि, ‘प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशांत सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे,’

दरम्यान, महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बीसीसीआयच्या समितीने बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाची पहाणी केली होती, यावेळी मैदानाला प्रथमश्रेणी सामन्यांचा दर्जा देण्यात आला.