जगात भारी डिसले गुरुजींचा PM मोदींच्या ‘मन की बात’ मध्ये गौरव होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. याचदरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वतीने ‘मन की बात’ (Mann Ki Baat) च्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही डिसले गुरुजींचे कौतुक करण्यात आले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या आगामी मन की बात या कार्यक्रमातही डिसले यांचा गौरव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. तब्बल 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.

जगभरातील 140 देशांतील 12 हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा झाली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचे नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार असून, त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळण्यास मदत होणार आहे.

राज्य सरकारकडून झाला सत्कार

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 9) सत्कार करण्यात आला. यावेळी रणजितसिंह डिसले यांच्या आई श्रीमती पार्वती, वडील महादेव डिसले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. वर्षा गायकवाड, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब उपस्थित होते.

10 वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे फळ मिळाले : रणजित डिसले

दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे योग्यवेळी फळ मिळाले. हा क्षण म्हणजे आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तसेच शिक्षण विभागाने मोलाचे सहकार्य केल्याची भावना ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी व्यक्त केली आहे.