मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केला भाजप प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पक्षांतर्गत होणाऱ्या खच्चीकरण्याच्या राजकारणाला कंटाळून अकलूजच्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत राज्यसभेचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

वानखेडे स्टेडियमच्या गरवारे हॉलमध्ये रणजितसिंहांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्याच प्रमाणे मोहिते पाटील यांच्या हजारो समर्थकांनी हि पक्ष प्रवेश केला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर मोहिते पाटील यांना विद्यमान खासदार म्हणून पुन्हा संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पक्षात तुमच्या नावामुळे गटबाजी उफाळत आहे असे दर्शवून मोहिते पाटील पितापुत्रांना राष्ट्रवादीच्या उमेदवारी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून करण्यात आला. राष्ट्रवादीच्या अशा खच्चीकरण्याच्या राजकारणाला कंटाळून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अखेर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.

विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक सदस्य होते. शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी पक्षाची स्थापना ज्या दिवशी केली. त्यावेळी काँग्रेसमधून जे निवडक नेते शरद पवार यांच्यासोबत नवा पक्ष स्थापन करण्यासाठी गेले. त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील हे एक महत्वाचे नेते होते. सोलापूर जिल्हयातील मोठं प्रस्थ असणारे नेते म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांची ख्याती होती. मोठया प्रस्थाचे फळ म्हणून शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्री पदी विराजमान केले होते. पुढे राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या नेतृत्वाचा जोर वाढत गेल्याने आणि काही समज गैरसमजातून मोहिते पाटील यांच्या घराण्याला राजकारणात नामशेष करण्याचा प्रयत्न सुरु केला. २००९ ते २०१९ पर्यंत मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षात राहून अघोषित अपृश्यता भोगली. या सर्व हीन वागणुकीचा आज अखेर अंत झाला आहे.

भाजपमध्ये प्रवेश झाल्याने रणजितसिंह मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निर्णायक होणार यात कोणतीही शंका नाही. तसेच मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सोलापुरात राष्ट्रवादीला कधीही भरून न येणारे खिंडार पडले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी नेतृत्वाची चिंता वाढली आहे.