राष्ट्रवादीला मोठा झटका : रणजितसिंह मोहिते-पाटील करणार भाजपात प्रवेश 

रणजितसिंह मोहिते पाटील यांची घोषणा

अकलूज : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असणारे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गटाच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. आज अकलूज येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्या (दि. १९) रोजी भाजप प्रवेश करणार असल्याचे म्हंटले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसल्याचे दिसून आले आहे. माढामधून विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. मोहिते-पाटील यांनी त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे बोलले जात होते. पण, राष्ट्रवादीतील नेत्यांचा मात्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाला विरोध असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान ४ खासदारांपैकी तिघांच्या उमेदवारीची घोषणा केली. परंतु, माढातील उमेदवार जाहीर न केल्याने विजयसिंह मोहिते हे दुखावले गेले. त्यातूनच आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी ते आता भाजपचा मार्ग पत्करु शकतात. अशी चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान त्या चर्चेला आता पूर्णविराम बसला आहे. विजयसिंह मोहिते यांनी मंगळवारी दुपारी ३ वाजता अकलुज येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी उपस्थित समर्थकांनी तुम्ही भाजपात प्रवेश करा आम्ही तुमच्या सोबत आहोत अश्या घोषणा दिल्या. त्यानंतर बोलतांना उद्या १२ वाजता आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी म्हंटले आहे.

विशेष म्हणजे, मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील गरवारे हॉल येथे भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मोहिते-पाटील पितापुत्रांचा भाजपा प्रवेश होणार आहे.

यावेळी, खा. विजयसिंह मोहिते पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह करमाळाचे शिवसेना आमदार नारायण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी, माळशिरस तालुक्यातील सर्व जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सभापती वैष्णविदेवी मोहिते पाटील, सांगोला, करमाळा, माढा, पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि हजारो समर्थक उपस्थित आहेत.

दरम्यान, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील या बैठकीत काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.