घरसामान शिफ्ट करण्याच्या नावाखाली खंडणी उकळणारा अटकेत

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरसामान शिफ्ट (Shift house goods) करुन करण्याच्या नावाखाली खंडणी (Ransom) उकळणाऱ्या आरोपीला (Criminal) पिंपरीच चिंचवड गुन्हे शाखेच्या (Crime branch) खंडणी विरोधी पथकाने अटक (Arrest) केली आहे. आरोपीने एका ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या नावाचा वापर करुन खंडणी उकळली होती. आरोपीकडून 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krushna prakash) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वीरेंद्रकुमार रामकिसन पुनिया (वय-25 रा. ट्रान्सपोर्टनगरी, निगडी, मुळ रा. राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. व्हीआरएल कार्गो या ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या नावाचा गैरवापर करून निगडी येथे व्हीआरएल कार्गो इंडिया पॅकर्स ही बनावट कंपनी स्थापन केली असल्याची माहिती तो देत होता. दरम्यान, कोथरुड येथील राजेश नायक यांना त्यांचे घराचे सामान बँगलोर येथे पोहोच करायचे होते. त्यासाठी त्यांनी www.vricargoindiapacker.in या संकेतस्थळावरून मिळालेल्या नंबरवरुन वीरेंद्रकुमार याचे खोटे नाव असलेल्या सोनू चौधरी नावावर संपर्क साधला.

बँगलोर येथे जाण्यासाठी अकरा हजारांचे भाडे ठरवले. नायक यांनी आठ हजार रुपये अ‍ॅडव्हानस दिले. मात्र, काही दिवसांनी नायक यांना फोन करून सामान पाहिजे असल्यास नऊ हजार रुपये खंडणी स्वरुपात मागितले. तसेच घरसामानही बँगलोर येथे पोहोच केले नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर राजेश नायक यांच्या वतीने त्यांचे मित्र आशिष गावडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली
.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात निगडीत अशी कोणतीही कंपनी नसल्याचे निष्पन्न झाले. VRL CARGO या नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर करुन आरोपीने फसवणूक करुन खंडणी उकळली असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व फेसबुकच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे सापडला. त्यानंतर निगडीच्या गोडाऊनमध्ये ठेवलेले घरसामान, दुचाकी, एक मोबाईल असा एकूण 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वीरेंद्रकुमार हा सोनू चौधरी, सोनू कुमार, विक्रम सिंग अशा वेगवेगळ्या नावांचा व मोबाईल क्रमांकाचा वापर करत होता. यासह व्हीआरएल कार्गो इंडिया पॅकर्स या नावाची खोटी कंपनी व वेबसाईट तयार केली असून ही कंपनी कुठेही नोंदणीकृत नसल्याचे तपासात समोर आले आहे.