खंडणी प्रकरण : बडतर्फ पोलिस शैलेश जगताप याच्यासह तिघांवर आणखी एक FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खंडणी आणि फसवणूक केल्याचे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर बडतर्फ पोलीस शैलेश जगताप याच्यासह तिघांवर आणखी एक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 लाख घेतल्यानंतर ते परत मागितले असता खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी दिली आहे. हा सर्व प्रकार 2015 पासून आजपर्यंत या कालावधीत घडला आहे. एका बडतर्फ पोलिसांलवर सलग तिसरा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलासह शहरात प्रचंड खळबळ माजली आहे.

याप्रकरणी बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, प्रकाश फाले आणि मीना कंजानी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघाची नावे आहेत. याबाबत सत्यभामा चांदगुडे (भालेराव) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या चिखली परिसरात राहण्यास आहेत. त्या नोकरी करतात. दरम्यान आरोपींनी संगनमतकरून त्यांना उंड्री येथील स.नं. 49 हिस्सा नं. 8/1 ही दोन गुंठे जागा पूर्वीच विक्री केली असताना तसेच आरोपींच्या मालकीची नसताना त्या जमिनीसाठी आणि औन्ध येथील जमिनीच्या व्यवहारापोटी फिर्यादी व त्यांच्या सहकारी यांच्याकडून 20 लाख रुपये घेतले. पंरतु त्यांना जमीन न देता त्यांची फसवणूक केली. त्यानंतर त्यांनी पैसे परत मागितले असता बडतर्फ पोलीस शैलेश जगताप याने पैसे परत मागितल्यास खोट्या गुन्ह्यात लटकवण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. शैलेश जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना समजली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.