खंडणीच्या गुन्ह्यात पत्रकार, बडतर्फ पोलिसाला एक दिवसाची पोलिस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खंडणी व फसवणूकीच्या गुन्ह्यात पत्रकार देवेंद्र जैन आणि बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या गुन्ह्यात पोलिसांनी पिस्तुल जप्त केले आहे.

याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात 7 जणांवर भादवी कलम 420, 323, 506 (2), 386, 120 ब, 34, 2 व 25 गुन्हा दाखल केला आहे. याबाबत व्यवसायिक ऋषीकेश बारटक्के (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.
या गुन्ह्यात यापूर्वी जयेश जितेंद्र जगताप (वय 30), परवेज शब्बीर जमादार (वय 35) आणि अमित विनायक करपे (वय 33) या तिघांना अटक केली असून, ते सध्या पोलिस कोठडीत आहेत.

फिर्यादी हे जमीन-विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपीनी फिर्यादी यांना सेनापती बापट रस्त्यावरील मोक्याची जागा विक्रीसाठी असल्याची माहिती देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे घेतले. परंतु जागा दिली नाही. तसेच त्यांचे पैसे देखील दिले नाहीत. तर त्यांना 1 कोटी 88 लाख रुपये देण्यासाठी मारहाणकरून धमकवण्यात आले. तसेच त्यांच्या पिस्तुल डोक्याला लावला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर प्रथम पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यापूर्वी कोथरुड येथील गुन्ह्यात जैन आणि जगताप यांना अटक केली होती. रविवारी त्यांचा या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर समर्थ पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले होते. त्या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान दोघांकडे तपास सुरू आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. ते पिस्तुल शैलेश जगताप यांचे असून, त्याचा परवाना असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या गुन्ह्यातील फरार आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बराटे याचा शोध घेण्यात येत आहे. परंतु तो अद्याप सापडलेला नाही. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like