बडतर्फ पोलिस जगताप, पत्रकार देवेंद्र जैन, RTI कार्यकर्ता रविंद्र बर्‍हाटे हे जमीनेचे कागदपत्रे परत देत नसतील तर तक्रार द्या : पुणे पोलिसांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खंडणीप्रकरणात अटक केलेल्या बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची जमिनीची कागदपत्रे सापडली आहेत. त्यापार्श्वभूमीवर ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे, किंवा वादातून कागदपत्रे आरोपींनी घेतली असतील तसेच कागदपत्रे परत देत नसतील त्या नागरिकांनी कोथरुड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी केले आहे.

कोथरुड पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन, आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बराटे तसेच एका महिलेसह अमोल चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात देवेंद्र जैन, शैलेश जगताप व महिलेला जामीन मिळाला आहे. त्यानंतर जैन व जगताप याला समर्थ पोलिसांनी खंडणी व फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी वेगवेगळ्या 6 पथके तयार करून लागलीच या दोन तिघांना अटक केली. तसेच त्यांच्या घरी व कार्यलयावर छापे टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यात पोलिसांना अनेकांच्या जमिनीचे कागदपत्रे सापडली आहेत. ही कागदपत्रे यांच्याकडे कशी आली. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्यामुळे कोथरुड पोलिसांनी ज्या नागरिकांचे कागदपत्रे या आरोपींनी घेतली आहेत किंवा त्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील सिहंगड रोड परिसर, कोंढवा, येरवडा, धनकवडी यासह जिल्ह्यातील जमिनीचे कागदपत्रे असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ते कागदपत्रे देत नसतील अश्यानी देखील कोथरुड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी केले आहे.