कारागृहातील 3 अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीची तक्रार, FIR दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला धमकावून त्याच्याकडून 1 लाख 8 हजाराची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून नागपूर मध्यवर्ती कारागृहात 7 वर्षांपूर्वी कार्यरत असलेल्या 3 तुरुंग अधिकाऱ्यांवर धंतोलीत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. कारागृहातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची गेल्या 2 महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी तृतीयपंथीच्या तक्रारीवरून 6 अधिकार्‍यांविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता.

कृष्णा चौधरी, गुलाब खरडे आणि रवींद्र पारेकर अशी गुन्हा दाखल झालेल्या तुरूंग अधिकाऱ्यांची नावे आहेत. यातील चौधरी सध्या नाशिक, खरडे अमरावती, तर पारेकर पुण्याच्या कारागृहात कार्यरत आहेत. 2013-15 या कालावधीत हे तिघेही अधिकारी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येच्या आरापोत मदनकुमार बाबुलालजी श्रीवास (वय 62 रा. हिंगणघाट, जि. वर्धा) हा आरोपी मध्यवर्ती कारागृहात अंडर ट्रायल कैदी म्हणून बंद होता. त्याला त्यावेळी बडी गोलमध्ये ठेवले होते. तेथून सेपरेट गुन्हाखाना येथे ठेवण्यासाठी आणि अन्य काही सुविधा देण्यासाठी आरोपी तत्कालीन अधिकारी कृष्णा चौधरी, गुलाब खरडे आणि रवींद्र पारेकर या तिघांनी श्रीवास याला 1 लाख 8 हजार 500 रुपयांची खंडणी मागितली होती.

त्याला जीवे मारण्याचीही धमकी दिली. कारागृहातून जामीनावर बाहेर पडल्यानंतर श्रीवासने याबाबत उच्च न्यायालयात तक्रार वजा याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणाची कसून चौकशी झाली. त्यानंतर 24 सप्टेंबर 2014 ते 24 एप्रिल 2015 या कालावधीत उपरोक्त अधिकाऱ्यांनी श्रीवासला धमकी देऊन खंडणी मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून धंतोली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.