‘जाब’ विचारल्यानंतर ‘खंडणीचा’ गुन्हा दाखल, चौकशी करणाऱ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सकाळी १० वाजता आलेल्या महिलेची ७ तासानंतरही तक्रार का घेतली नाही, याची चौकशी करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी चक्क सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वादावादीनंतर भोसरी पोलिसांनी रात्री या महिलेचा गुन्हा दाखल करुन घेतला. भोसरी पोलीस ठाण्याच्या डीओ रुममध्ये शनिवारी सायंकाळी ५ वाजता हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. बी. हंडाळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन संजय कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, माधुरी गजानन धोटे (रा. कृष्ण मंदिरासमोर, आंळदी रोड, भोसरी) या तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. संजय कांबळे व काही महिला, पुरुष कार्यकर्ते पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता आले. त्यांनी ही महिला सकाळी १० वाजता तक्रार देण्यास आली असताना तुम्ही या महिलेची तक्रार का घेतली नाही, याची चौकशी केली. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी आपल्या अंगावर धावून येऊन शिवीगाळ करुन कॉलर पकडून तुझ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी दमदाटी करुन फिर्यादीला धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अशी फिर्याद दिली आहे.

या प्रकाराबाबत पोलिसांनी सांगितले की, ही महिला सकाळी तक्रार देण्यासाठी आली नव्हती. सीसीटीव्हीवरुन याची खातरजमा करण्यात आली आहे. संजय कांबळे यानेच या महिलेला तु सकाळी तक्रार देण्यासाठी आले असे सांगितल्याचे या महिलेने सांगितले आहे.

दरम्यान, माधुरी धोटे यांच्या फिर्यादीवरुन अर्चना जळमकर (रा. नूर मुहल्ला कॉलनी, दिघी रोड, भोसरी) यांच्यावर ५ लाख रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिघी रोड येथे अरविंद काळे यांच्या खोलीत ८ जून रोजी सकाळी १० वाजता घडली होती. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, त्या घरी असताना अर्चना जळमकर या जबरदस्तीने घरात घुसून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करुन हाताने मारहाण केली. त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली.

आरोग्यविषयक वृत्त-