पुण्यात माथाडी कामगारांच्या नावावर खंडणी वसुली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाकडेवाडी येथील दुचाकीच्या शोरुमचालकाला आमचेच माथाडी कामगार गाड्या उतरविण्याचे काम करतील, दुसरे कोणी करणार नाही, अशा धमक्या देऊन त्यांच्याकडून प्रत्येक गाडीमागे १२ हजार रुपयांची खंडणी घेणाऱ्या पाच जणांविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रमजान जमाल शेख (वय २७), नासीर इसामु शेख (वय २७, दोघे रा़ पाटील इस्टेट) व त्यांचे तीन साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ब्रम्हा मोटर्स चे यशवंत लक्ष्मणराव मोरे (वय ४२, रा. मॉडेल कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – २० लाखासाठी तरुणाचे अपहरण 

मोरे यांचे वाकडेवाडी येथे दुचाकीचे शोरुम आहे. या शोरुममध्ये ट्रकमधून गाड्या येतात. त्या खाली करण्याचे काम त्यांचेच कामगार करतात. रमजान व त्याचे साथीदार गेल्या ३ महिन्यांपासून शोरुममध्ये येऊन येथे लोडिंग व अनलोडिंग होणाऱ्या गाड्या हे आमचे माथाडी कामगार करतील, दुसरे कोणी करणार नाही अशा धमक्या देऊन आमचे माथाडी कामगार गाडी खाली करो अथवा न करो तरीही तुम्हाला प्रत्येक गाडीमागे १२ हजार रुपये द्यावे लागतील. आम्हाला पैसे नाही मिळाले तर शोरुम तोडफोड करुन तुमच्या कामगारांना मारहाण करुन येथून पळवून लावू. शोरुमध्ये कोणालाही काम करु देणार नाही. अशा धमक्या देत होते. १३ फेब्रुवारी रोजी अनलोडिंग झालेल्या गाडीचे पैशाची जबरदस्तीने मागणी करु लागले. शेवटी घाबरुन मोरे यांनी त्यांना १२ हजार रुपये दिले. त्यानंतर ते आम्हाला ओळखत आहात ना. तुमचे शोरुम येथून गायब करु, अशी धमकी देऊन ते निघून गेले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.