फडणवीसांचे नाना पटोले यांना प्रत्त्युत्तर, म्हणाले – ‘खंडणीखोरांना समर्पण कळलेच नाही अन् कळणार देखील नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून देशभर निधी संकलन केले जात आहे. भाजपच्या या अभियानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी जोरदार टीका केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे पटोले यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. खंडणी वसुली करणा-यांना सेवा काय कळणार अशा शब्दात फडणवीस यांना टोला लगावला आहे. श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी गोळा करणे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना वसुली वाटते. ज्यांना कधी श्रीराम कळलेच नाहीत त्यांना श्रीराम सेवा काय कळणार. खंडणीखोरांना समर्पण हे कधीच कळले नाही आणि कळणारही नाही. श्रीराम हा आमचा धर्म आहे आणि कर्म आहे. जय श्रीराम असे ट्विट भाजपाने केले आहे.

राम मंदिराच्या नावाने टोलवसुली केली जात आहे. भाजपला हा अधिकार कुणी दिला? ज्याने राम मंदिरासाठी निधी दिला नाही त्याला त्रास दिला जात असल्याची एक तक्रार देखील माझ्याकडे आली आहे, असे पटोले म्हणाले. महाराष्ट्रामध्ये भगवान रामाच्या नावाने पैसा जमा करणारे हे लोक कोण ? त्यांना ठेका दिलेला आहे का? केंद्र सरकारने याचे उत्तर द्यावे, असे सवाल उपस्थित करत पटोले आक्रमक झाले होते. पटोले यांच्या आरोपानंतर विधानसभेत एकच गदारोळ उडाला. भाजप नेत्यांनी पटोलेंच्या आरोपावर आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षाना सभागृहाचं कामकाज काहीकाळ स्थगित करावे लागले.