युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर शरीरसुखाच्या मगाणीसह खंडणीचा गुन्हा

अमरावती : पोलीसनामा आॅनलाइन – चांदूर रेल्वे येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार महिलेने युवक काँग्रेसच्या धामणगाव रेल्वे विधानसभा अध्यक्षावर खंडणी मागीतल्याचा तसेच शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संदीप शेंडे (३२, रा.चांदूर रेल्वे) असे गुन्हा दाखल झालेल्या युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षाचे नाव आहे. दरम्यान, गैरप्रकार उघडकीस आणल्यानेच हा खोटा आरोप करण्यात आल्याचे शेंडे यांनी म्हटले आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक एसटी बस आगाराच्यामागे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहात जाऊन युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ३ दिवसांपूर्वी येथील गलथान कारभार उघडकीस आणला होता. त्यानंतर या वसतिगृहात भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार महिलेला युवक काँग्रेसच्या चांदूर रेल्वे येथील विधानसभा अध्यक्षाने खंडणी तसेच शरीरसुखाची मागणी केली, अशा आशयाची तक्रार चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये ३० ऑक्टोबर रोजी दाखल केली.  या तक्रारीवरून पोलिसांनी संदीप शेंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणात अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसली, तरी या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना संदीप शेंडे यांनी म्हटले आहे की, सदर वसतीगृहात मुलींना निकृष्ट दर्जाचे भोजन आणि वाईट वागणूक दिली जात होती. त्यामुळे मुलींच्या तक्रारीवरून आम्ही युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी वसतीगृहात गेलो असता तेथे हा प्रकार दिसून आला. याबाबत आयुक्तांना माहिती देण्यापूर्वीच सदर कंत्राटदार महिलेचा फोन आला. यामध्ये त्यांनी तब्बल १५ ते २० मिनिटांवर चर्चा करून माफी मागितली. हा पुरावा माझ्याकडे आहे. तसेच तक्रार न करण्याकरिता पैशांची देखील ऑफर दिली. प्रत्यक्ष भेटण्याची विनंती केली. परंतु त्यांची ऑफर फेटाळल्यानेच त्यांनी आमच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली. दरम्यान, शासकीय वसतिगृहातील गलथान कारभार चव्हाट्यावर आल्यावर खंडणी मागितल्याची तक्रार संबंधित भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केल्यामुळे शहरात चर्चेला उधान आले.

जाहिरात