राज्यात 13 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होणार, मंत्री रावसाहेब दानवेंचा दावा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभेचे वेध सर्वांनाच लागले आहेत. प्रत्येकजण विधानसभा निवडणुका कधी होणार याचे भाकीत करत असताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यात 13 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होणार असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी आचारसंहिता लागू होण्यासाठी 12 दिवसांचा दावा करताना कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये संबोधित करताना त्यांनी हा दावा केला आहे. दानवे यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याआधीच दानवे यांनी गणपतीनंतर आचारसंहिता लागणार असल्याचा गौप्यस्फोट केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा निवडणुकीचे भाकित केले होते. त्यांनी देखील गणपतीनंतर आचारसंहिता लागणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. 15 ऑक्टोबरच्या जवळपास विधानसभा निवडणुका होतील, असेही मुनगंटीवार म्हणाले होते. विधानसभा निवडणुकीची तारीख गणेशोत्सव झाल्यानंतर लगेच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –