मुख्यमंत्री फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांच्यातील ‘वॉशिंग’ पावडरच्या वादात दानवेंची ‘उडी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरु असलेल्या वादात आता भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांनी भाजप तसेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना निशाणा करत म्हटले होते कि, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पक्षाला डागाळलेले नेते कसे काय चालतात ? त्यांना कोणत्या वॉशिंग पाऊडरमध्ये धुवून पावन केले जाते, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता.

त्यानंतर आता रावसाहेब दानवे यांनी यात उडी घेत सुप्रिया सुळे यांना उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे यांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले कि, आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर असून या पावडरने धुवून आम्ही त्यांना पक्षात घेतो. याआधी सुप्रिया सुळे यांनी हे आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर देताना म्हटले होते कि, आमच्याकडे वॉशिंग पावडर नसून डॅशिंग रसायन आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या टीकेला उत्तर देताना म्हटले होते कि, सगळीच रसायने चांगली नसतात तर काही रसायने घातक देखील असतात. त्यांच्यापासून सावध राहायला हवे.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या या टीकेनंतर आता सुप्रिया सुळे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –