कोणी विरोधात आलं तर त्यांना हरवून निवडणुका जिंकू- रावसाहेब दानवे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र येणे, ही काळाची गरज आहे. आम्ही युतीसाठी प्रयत्न करतोय. मात्र तरीही युती झाली नाहीतर जे पक्ष आमच्या विरोधात येतील, त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आता आघाडीचे राजकारण सुरु आहे. उत्तर प्रदेशात सपा-बसपा युती झाली आहे. युपीए देखील केंद्रांत सर्व पक्षांना एकत्र करुन निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. त्याचपध्दतीने एनडीए देखील समविचारी पक्षांशी आघाडी करत आहे. या आघाडीचे यश आपण मागील निवडणुकीत पाहिले आहे, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

भाजपकडून आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेबरोबर भाजपची परंपरागत युती आहे. मात्र शिवसेना म्हणते, युतीची चर्चा ही दिल्लीच्या स्तरावर होईल. राज्यपातळीवर याची चर्चा होणे आवश्‍यक आहे. जर यातूनही काही जागांबाबत मतभेद झाले तर हा वाद केंद्रीय पातळीवर सोडवावा, हे धोरण असल्याचेही त्यांनी म्हटलं. तसंच राज्यातच युतीची चर्चा व्हावी अशी आमची भूमिका आहे, असं दानवेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, प्रश्न स्वबळाचा नाही, आघाडीच्या राजकारणाचा आहे. तरीदेखील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांत आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे, असं सांगत त्यांनी एक प्रकारे स्वबळाचा नाराच दिला आहे.