भाजपच्या ‘या’ नेत्याला मिळाला CBI रिपोर्ट, २ लाख ६० हजार मतांनी विजयी

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा तीसरा टप्पा २३ एप्रील रोजी पार पडला. या टप्प्यात राज्यातील १४ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले. यामध्ये जालना लोकसभा मतदार संघात मतदान झाले असून या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये लढत होत आहे. राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीत कोणाचा विजय होणार, कोणाचा परभाव होणार याचा सर्व्हे अनेक संस्था करत असतात. मात्र भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी CBI च्या रिपोर्टचा दाखला देत आपण २ लाख ६० हजार मतांनी विजयी होणार असल्याचे एका जाहीर सभेत सांगितले.

जालना येथे २० एप्रिल रोजी झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. या सभेत बोलताना दानवे म्हणाले, मला सीबीआयचा रिपोर्ट मिळाला आहे. यामध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मी सर्वात लोकप्रिय उमेदवार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर सिल्लोड मतदारसंघातून मला मताधिक्य कमी मिळते मात्र यंदा मला या मतदारसंघातून ६८ टक्के मिळतील तर काँग्रेसला २८ टक्के मते मिळतील, असे त्यांनी सांगितले. तसेच या रिपोर्टनुसार सर्व तालुक्यांमध्ये मला सर्वाधीक मते मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

जालन्यात केलेल्या दानवेंच्या भाषणाचा व्हिडीओ काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तर आम आदमी पक्षाने दानवे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. जर सीबीआयने अशा प्रकारचा सर्व्हे केला असले तर संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘आप’ने केली आहे. राज्यातील सत्तधारी पक्षाच्या अध्यक्षांच्या विधानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आयोगाकडे केल्याचे ‘आप’च्या नेत्याने सांगितले.