केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘ठाकरे’ शैलीत खरपूस ‘समाचार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आमच्यावर टीका करणार्‍या रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल, माझा बाप भाडोत्री नाही. तुमचा बाप आहेराची पाकिटे घेऊन मोजतो, असे सांगून गेला, त्याने ते पैसे खाल्ले का माहिती नाही, अशा तिखट शब्दात शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते राबसाहेब दानवे यांना फटकारले. आज शिवसेनेचा दसरा मेळावा कोरोनामुळे50 पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ऑनलाईन घेण्यात आला, यावेळी ठाकरे बोलत होते. लग्न तुम्ही केले आणि बापाकडे मागताय, असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले होते, याचा ठाकरे यांनी समाचार घेतला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही घणाघाती हल्लाबोल केला.

भाजपाला इशारा देताना मुख्यमंत्री म्हणाले, मी आज मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून टाकला आहे. मला संयमाचे महत्त्व कळते. महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणार्‍यांच्या छाताडावर गुढी पाडवा साजरा करेन. वाघाची अवलाद आहे, डिवचाल तर पस्तवाल.

मोदी सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, देश संकटात आहे आणि भाजपा राजकारण करत आहे. कोरोना आहे, संकटे आहेत, जीएसटी नाही, पैसे कुठून येणार? आमचा जीएसटीचा निधी केंद्र सरकार का देत नाही. सुमारे 38 हजार कोटी रुपये केंद्राकडे आहेत. जीएसटी सदोष असेल तर मोदींनी मागे घ्यावा आणि देशाची माफी मागावी, अशी थेट टीका ठाकरे यांनी केली.

ठाकरे पुढे म्हणाले, घंटा बडवा, थाळ्या बडवा, हे तुमचे हिंदुत्व, आमचे हिंदुत्व असले नाही. हिंदुत्व हे आमचे राष्ट्रीयत्व आहे. बाबरी वेळी शेपट्या घालून बसणारे आता हिंदुत्वावर बोलत आहेत. आम्हाला विचारतात तुमचे हिंदुत्व कुठे गेले? येथे गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता. गोव्यात गोवंश बंदी का नाही. सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या.

भाजपाला इशारा देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, भाजपाला केवळ पाडापाडीत रस आहे, ही अराजकता आहे. भाजपा म्हणजे अहंकारी राजा आणि कळसुत्री बाहुल्या आहेत. महाराष्ट्रात यापुढे कळसुत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही. सरकार पाडून दाखवाच, असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, भाजपाचा महाराष्ट्र द्वेष पाहता मला राज्यातील जनतेला आवाहन करायचे आहे की, सावध रहा. आदित्य ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाली हे भयंकर होते. बिहारच्या सुपुत्रावर चिखलफेक करणारे महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करत आहेत.

राणे कुटुंबियांवर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, तुम्ही आरेतील झाडांची तुम्ही रातोरात कत्तल केली होती, आम्ही 808 एकराचे जंगल वाचवले. एक रुपया खर्च न करता मेट्रो कारशेड उभारत आहोत. बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत.

You might also like